ठाणे - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ नाना याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर्स ठाण्यात लागल्याने खळबळ उडाली. राजन सध्या कारागृहात शिक्षा भोगत असतानाही ठाण्यातील गडकरी रंगायतन, कळवा नाका आणि धर्मवीरनगर (तुळशीधाम) येथील ठाणे महापालिकेच्या टीएमटी बस थांब्यावर त्याच्या वाढदिवसानिमित्त बॅनर्स लागले आहेत. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली.
गेल्या काही वर्षात ठाणे पोलिसांनी शहरातील गुंडगिरी संपुष्टात आणली असतानाच पुन्हा छोटेमोठे गुंड डोके वर काढू लागले आहेत. अशातच रविवारी मध्यरात्रीनंतर ठाण्यात ठिकठिकाणी कुख्यात छोटा राजनच्या अभिष्टचिंतनाचे बॅनर्स ठिकठिकाणी झळकल्याने खळबळ उडाली. छोटा राजनचा वाढदिवस 13 जानेवारी रोजी आहे. याचे औचित्य साधून ठाण्यातील तलावपाळी नजीकच्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहासमोरील टीएमटी बस थांब्यावर, कळवा नाका आणि घोडबंदर रोडवरील धर्मवीरनगर याठिकाणी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले.
कुख्यात गुंड छोटा राजनच्या वाढदिवसाचे बॅनर्स हटवले सदर बॅनर्सवर सी.आर.सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य असा उल्लेख असून आधारस्तंभ राजेंद्र सदाशिव निकाळजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनरवर शुभेच्छुक म्हणून संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष प्रकाश भालचंद्र शेलटकर यांच्या नावासह संघटनेच्या ठाणे शहर महिला अध्यक्ष संगीताताई शिंदे,मुंबई शहर अध्यक्ष राजाभाऊ गोळे आणि संस्थापक अध्यक्ष वकील हेमचंद्र उर्फ दादा मोरे आदींची छबी झळकत होती. या अनधिकृत बॅनरबाजींची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने हे बॅनर हटवून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. यातील शेलटकर हा ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राज्यातील सत्तेत असलेल्या एका मोठ्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, छोटा राजनविरोधात हत्या, खंडणीसह धमकावणे आदी विविध गुन्ह्यांची नोंद आहे. मुंबईतील एका वरिष्ठ पत्रकाराच्या हत्येप्रकरणी परदेशात छोटा राजनला अटक करण्यात आली. तेव्हापासून राजन तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीस छोटा राजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहतो.