ठाणे- जिल्ह्यातील येऊर तलावात बुडून चार मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर येथील वनविभागाच्या प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रात पर्यटकांना येण्यास बंदी घालण्याची मागणी संतोष आंग्रे या पर्यावरण प्रेमीने केली होती. येऊर येथील एकलव्य क्रीडा मंडळ आणि येऊर संवर्धन व विकास समिती यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या मागणीला यश आले आहे. वन विभागाने आता येऊर येथील नील तलाव परिसरासह प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेशास मज्जाव असल्याचे फलक लावले आहेत. या कारवाईनंतर मात्र पर्यटकांंचा हिरमोड झालेला आहे.
येऊर पर्यटनस्थळी लागले प्रवेशबंदीचे फलक कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये निसर्गप्रेमी पर्यटनाला मुकले होते. लॉकडाऊन खुला झाला त्याच दरम्यान मान्सूनला सुरुवात झाली. त्यामुळे येऊर येथील वनविभाग आणि नील तलावाचा परिसर पर्यटकांना साद घालू लागला. मात्र, येऊर येथे पर्यटनासाठी आलेल्या चार मुलांचा येथील नील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्या. त्यानंतर स्थानिकांकडून पर्यटन बंदीच्या मागणीनंतर पोलीस आणि वनविभागाला जाग आली आणि पर्यटकांना येऊरच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करणारे फलक लावण्यात आले आहेत.
दंडात्मक कारवाईचे फलक-
कोरोना काळात जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर मनाई हुकमानंतर येऊरच्या प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटकांची आणि बालगोपाळाची गर्दी दिसत होती. मात्र, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने या ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्याचे ग्रामस्थांकडनू सांगण्यात येत आहे. मात्र मागील १५ दिवसात मुलांचे बळी गेल्याची घटना घडल्यानंतर प्रशासाने कडक धोरण अवलंबले आहे. येऊरच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये ३ वर्षांची शिक्षा आणि २५ हजारांच्या दंडाची तरतूद असल्याचे फलक या परिसरात लावण्यात आले आहेत.
पर्यटकांची गर्दी -
निसर्गरम्य असलेल्या येऊर परिसरात हॉटेल्स ढाबे यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पावसाळ्यात निसर्गसौदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी मोठ्याप्रमाणात गर्दी होते. मात्र, प्रशासनाने आता या पर्यटनस्थळी बंदी घातली आहे. परंतु या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होऊ नये सुरक्षा रक्षकांचा पहारा ठेवण्यात यावा,अशी मागणी देखील पर्यावरण प्रेंमीमधून होऊ लागली आहे.