महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सत्तेची मस्ती आलीयं', मनसेच्या नांदगावकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा - राकेश पाटील हत्या प्रकरण न्यूज

मनसे नेते बाळा नांदगावकर हे राकेश पाटील यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी अंबरनाथमध्ये पोहचले. यावेळी त्यांनी राकेश पाटील हत्याप्रकरणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. सत्ता त्यांच्या हातात आहे, म्हणून सत्तेची मस्ती आली, अशी टीका त्यांनी केली. तसेच पोलीस लवकरच याचा छडा लावून मुख्य सूत्रधारालाही अटक करतील, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

बाळा नांदगावकर -ठाकरे
बाळा नांदगावकर -ठाकरे

By

Published : Nov 2, 2020, 1:36 PM IST

ठाणे - मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी अंबरनाथ शहर उपाध्यक्षाच्या हत्येप्रकरणातून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 'ज्याच्या हाती ससा तो पारधी' सत्ता त्यांच्या हातात आहे, म्हणून सत्तेची मस्ती आली, परंतु सत्ता येते आणि जाते. त्यांनी गाय मारली, म्हणून आम्ही काय वासरू मारणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले. मनसे नेते बाळा नांदगावकर हे राकेश पाटील यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी अंबरनाथमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

थेट ठाकरे सरकारवर टीका

अंबरनाथमधील बिल्डर पटेलच्या सांगण्यावरून मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची धारदार हत्याराने भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक आरोप मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी 4 दिवसापूर्वीच केला होता. त्यानंतर आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी तर थेट ठाकरे सरकारमधील काही स्थानिक नेतेच या हत्याप्रकरणात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. व्यवसायिक वर्चस्वाच्या वादातून 6 ते 7 जणांच्या टोळक्याने हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला, तरी मनसेचे बाळा नांदगावकर यांच्या खळबळजनक वक्तव्यामुळे याप्रकरणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे.

संबंधितांवर गुन्हे दाखल

राकेश पाटील यांच्या हत्येप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आरोपी डी. मोहन, भरत पाटील, विनायक पिल्ले, अक्तर खान, विजय दासी , राजू दासी, रमेश दोहार व इतर 2 ते 3 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोनच तासात 4 आरोपीना अटक करण्यात आली. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व मुख्य आरोपी दोन्ही फरार असल्याची नाराजी मनसे नेत्यांनी व्यक्त केली. पोलिसांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे पोलीस लवकरच याचा छडा लावून मुख्य सूत्रधारालाही अटक करतील, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

थरारक हत्याकांड

अंबरनाथ शहरातील पालेगाव परिसरात अनेक इमारतींचे बांधकाम सुरू आहे. याच परिसरात जैनम सोसायटीचे काम सुरु असून त्या ठिकाणी काही कामानिमित्त 28 ऑकटोबर रोजी सायंकाळी राकेश पाटील गेले असता यांच्यावर 6 ते 8 जणांच्या टोळक्याने धारदार हत्यारांनी हल्ला केला. यावेळी पाटील यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेत पाटील यांना तात्काळ कल्याणच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

राकेश पाटील यांच्या हत्येमागील कारण

अंबरनाथ पालेगाव परिसरात सुरु असलेल्या नव्या गृह संकुलात पावसाचे पाणी साचते तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे कोणीही या परिसरात घरे खरेदी करू नये, अशी जनजागृती मृतक राकेश पाटील करीत होते. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांच्या घरे विक्रीवर परिणाम झाला. त्यातच यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकानी या परिसरात घरे खरेदी केलीच नाहीत. त्यामुळेच राकेश पाटील यांची पटेल बिल्डरच्या सांगण्यावरून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.

मनसेच्यावतीने मोर्चाचा इशारा

हत्येनंतर दोन तासातच चार हल्लेखोरांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. तर हल्लेखोरांना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपीसह सूत्रधार अध्यापही फरारच असून त्यांना तत्काळ अटक न केल्यास मनसेच्या वतीने 6 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला जाणार असल्याचा इशारा मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details