ठाणे - कोरोना आणि आर्थिक मंदीचा परिणाम सर्व देशभरात दिसतोय. अशा वेळी मुस्लिम धर्मियांच्या बकरी ईद वर देखील या संकटाचा परिणाम दिसत आहे. एकीकडे पैशांची अडचण आणि दुसरीकडे कोरोना आजाराची भीती त्यामुळे यावर्षी बाजारात ईद निमित्त बकरे देखील कमी प्रमाणात आले आहेत. त्यात खरेदीदारही येत नाहीत. त्ययामुळे विक्रेत्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबईतील देवनार प्रमाणेच ठाण्यातील मुंब्रा येथे करोडो रुपयांचे बकरे खरेदी आणि विक्री केले जातात. त्यासाठी देशभरातून व्यापारी आणि ग्राहक येथे येत असतात. मात्र यावर्षी या बाजारात देखील मंदी दिसून येत आहे. साधारण पस्तीस ते चाळीस हजारांना विकले जाणारे बकरे या वर्षी केवळ पंधरा ते वीस हजारात विकावे लागत आहेत.
मुंब्रा येथील बकरी विक्रेते ग्राहकांच्या कमतरतेमुळे हैराण.... हेही वाचा -रील लाईफमधील व्हिलन, आणि रिअल लाईफमधील हिरो; पाहा सोनू सूदची विशेष मुलाखत!
व्यापाऱ्यांकडे आणि शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात बकरे उपलब्ध आहेत. मात्र, बाजारात त्यासाठी ग्राहक उपलब्ध नाहीत. त्यामुळे मिळेल त्या दरात बकरे विकले जात आहेत. दुसरीकडे कोरोनामुळे काम धंदा ठप्प असल्याने बकरे विकत घेण्यासाठी देखील कमी प्रमाणात मुस्लिम बांधव जात आहेत. तसेच जास्त किमतीच्या बकऱ्यां ऐवजी कमी किमतीचे बकरे घेण्यास पसंती दिली जात आहे.
दरवर्षी फक्त मुंब्रा विभागात अंदाजे वीस हजार बकरे विकले जायचे. यावर्षी मात्र आतापर्यंत केवळ 2300 बकरे विकले गेले आहेत. असे असले तरी बकरे विकत घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा आणि सोशल डिस्टंसिंग चा वापर केला जात आहे. यावर्षी मंदीमुळे बकरे हे कमी विकले जाणार याचा अंदाज व्यापाऱ्यांना होता. पण त्यापेक्षा ही जास्त परिणाम प्रत्यक्ष बाजारात दिसत आहे.