ठाणे - जिल्ह्यातील ठाणे शहर मतदारसंघातील एका मतदान केंद्रात येथे असलेल्या ईव्हीएम मशीनवर शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया जवळपास 20 ते 25 मिनिटे थांबवावी लागली. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते असलेले सुनील खांबे यांनी हा प्रकार केला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
सुनील खांबे हे ठाणे विधानसभा मतदारसंघातील सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले होते. मतदान झाल्यानंतर ते मतदान केंद्राच्या बाहेर न पडता, त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या बॉटलीतील शाई ईव्हीएम मशीनवर फेकली. त्यामुळे मतदान केंद्रामध्ये आणि मशीनवर देखील ही शाई पडली. शाई फेकून त्यांनी मतदान केंद्रामध्येच ईव्हीएम मशीनच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना मतदार केंद्राच्या बाहेर काढले. मात्र, हा गोंधळ 15 ते 20 मिनिटे सुरू असल्याने 20 मिनिटे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबली होती.