ठाणे - जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे भिवंडी, कल्याण- डोंबिवलीत सखल भागांमधील राहणाऱ्या शेकडो रहिवाशांच्या घरात पाणी शिरून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान होऊन त्यांचे हाल झाले होते. मात्र, आज ( 6 जुलै ) पहाटेपासून पावसाने उसंत घेतल्याने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले आहे. दुसरीकडे बदलापूरमधून वाहणाऱ्या उल्हासनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली ( Ulhas River Increase In Water Level ) आहे. डोंगर भागातील घाट माथ्यावर सततच्या पढणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार - गेल्या तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली असताना ९ जुलै पर्यंत जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्थानिक यंत्रणांना भुस्खलन होऊ शकणाऱ्या गावांची आणि क्षेत्रांची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करून तेथील स्थानिक जनतेला त्याबाबत माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.