ठाणे Ayodhya Ram Mandir News :येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा नयनरम्य सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. देशात सर्वत्र राम भक्तीची लाट पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक विविध मार्ग अवलंबत आहेत. यासाठी नागरिक राम मंदिराच्या छोट्या प्रतिकृती विकत घेण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सर्वत्र जल्लोष: गेली पाचशे वर्ष ज्या क्षणाची समस्त हिंदूधर्मीय जनता वाट पाहत होती तो क्षण आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येणाऱ्या २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार असून त्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. गेल्या शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर आणि अगणित न्यायालयीन लढायानंतर राममंदिर न्यासाच्या बाजूने निकाल लागला आणि भव्य राम मंदिर निर्माण झाले. यासाठी अनेक राम भक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असताना संपूर्ण देश विदेशात रामभक्तीची लाट पसरली आहे.
ऐतिहासिक आणि नयनरम्य सोहळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या सुरक्षा कारणास्तव 22 जानेवारी रोजी कोणीही आयोध्येत येऊ नये असं आवाहन केलं होतं. त्यामुळं अनेकांचे मन व्यथित झालं. हा अद्भुत, ऐतिहासिक आणि नयनरम्य सोहळा 'याची देही, याची डोळा' पाहायला मिळेल हे स्वप्न भंगल्यानं अनेक भारतीय नागरिकांनी आता पंतप्रधानांच्या आव्हानानुसार घरातच राहून आपापल्या परीने हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी राम मंदिराच्या छोट्या छोट्या प्रतिकृती विकत घेण्यासाठी रामभक्त गर्दी करत आहेत. त्यासोबतच श्री रामाचे चित्र असलेले भगवे झेंडे देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत.
राम भक्तांसाठी राम मंदिर प्रतिकृती :ठाण्यात साइन बोर्डचा व्यवसाय करणारे सतीश वागधरे आणि त्यांचा मुलगा प्रथम वाघधरे यांनी अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या राम मंदिर प्रतिकृती राम भक्तांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. चार इंच, सहा इंच आणि 14 इंच या साईजमध्ये या प्रतिकृती उपलब्ध असून त्याची किंमत अत्यंत माफक ठेवण्यात आली आहे. एक लहानशी प्रतिकृती बनवण्यासाठी अनेक तासांची कठोर मेहनत करावी लागते. त्यासाठी प्रचंड एकाग्रतेची गरज असते. परंतु राम भक्तांसाठी ही आपली प्रकारची सेवाच असल्याचं प्रथम वाघधरे यांनी सांगितलं. याच प्रतिकृती ऑनलाइन हजार रुपयांना विकल्या जात असून आपला हेतू त्यातून नफा कमवण्याचा नसल्याचंही त्यानं सांगितलं. राम भक्तीच्या लाटेत प्रत्येकाने सामील व्हावे यासाठीच आपण हा उपक्रम राबवल्याचं प्रथमने सांगितलंय.