ठाणे - कोरोनाकाळात जीवनसत्त्वासह आयर्वेदिक रान भाज्यांचे शहरी भागातील नागरिकांना महत्त्व कळल्यापासून पावसाळ्याच्या दिवसात रानावनात पिकणाऱ्या रान भाज्यांना अधिकच मागणी वाढली आहे. त्यातच श्रावण महिण्याच्या पहिल्याच सोमवारी कृषी विभागाकडूनही भिवंडी तहसील कार्यालयाच्या आवारातच रान भाज्यांचे प्रदर्शन व विक्री करीत जनजागृती सुरू केली आहे.
महिला बचतगटांच्या पुढाकाराने रानभाज्या प्रदर्शन व विक्री -
शहरात राहणाऱ्यांना बहुतांश नागरिकांना पावसाळ्यातील रानावनात उगवणाऱ्या विशेष आयुर्वेदिकसह जीवनसत्त्व असलेल्या रान भाज्यांची ओळख नसते. यामुळे ते या भाज्या खाणे टाळतात. मात्र, अशा रानभाज्यांची सर्वांना ओळख व्हावी, या उद्देशाने जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून भिवंडी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात रानभाज्या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विभागातर्फे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत नोंदणी असलेल्या महिला बचतगटांच्या पुढाकाराने हे आयोजन करण्यात आले होते.