ठाणे -दहीहंडी कार्यक्रम रद्द करत पूरग्रस्तांना मदत केली असे खोटे सांगून अनेक आयोजकांनी पूरग्रस्तांची क्रूर थट्टा केल्याचा आरोप मनसेचे ठाणे, पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. दहीहंडी रद्द करून पूरग्रस्तांना कोणी किती मदत केली हे जाहीर करा, अन्यथा जनतेत पितळ उघडे करू असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
पूरग्रस्तांना कोणी किती मदत केली हे जाहीर करा अन्यथा पितळ उघडे करू; मनसेच्या अविनाश जाधव यांचा इशारा
दहीहांडी कार्यक्रम रद्द करत पूरग्रस्तांना मदत केली असे खोटे सांगून अनेक आयोजकांनी पूरग्रस्तांची क्रूर थट्टा केल्याचा आरोप मनसेचे ठाणे,पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. दहीहंडी रद्द करून पूरग्रस्तांना कोणी किती मदत केली हे जाहीर करा अन्यथा जनतेत पितळ उघडे करू असा ईशारादेखील त्यांनी दिला आहे.
याविषयी बोलताना जाधव म्हणाले, "आपण आपल्या गोविंदा उत्सवात दहीहंडी तर आयोजित केलीच, परंतु पूरग्रस्त कुटुंबाना व्यासपीठावर बोलावून त्यांना मदत देखील केली. जे बोललो ते करून दाखवले. परंतु अनेक आयोजकांनी मदत करू असे खोटे आश्वासन देत पुरग्रस्तांची क्रूर थट्टा केली आहे. त्या सगळ्या मंडळानी केलेल्या मदतीचा तपशील जाहीर करावा अन्यथा असल्या लोकांना सर्वांसमोर उघडे पाडू"
यावर्षी महापुराचे कारण देऊन अनेक लहानमोठ्या दहीहंडया रद्द केल्या गेल्या होत्या. त्यातून वाचवलेले पैसे पूरग्रस्तांना देणार, अशा घोषणादेखील अनेक आयोजकांनी केल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र असे केल्या गेले का, हे जाणून घेण्यासाठी आणि ज्यांनी खोटे आश्वासन दिले त्यांना धडा शिकवण्यासाठी मनसेने हा पवित्रा घेतला आहे.