ठाणे - कल्याणमधील एका रिक्षाचालकाने कोरोना प्रादुर्भावाचा धोका ओळखून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनोखी शक्कल वापरली आहे. या चालकाने रिक्षातच सॅनिटायझरचे फवारे बसवून खबरदारी घेतलीय. गफूर शेख असे या रिक्षाचालकाचं नाव असून तो कल्याण पश्चिमेकडील बिर्ला महाविद्यालय परिसरात राहतो.
कल्याणमधील एका रिक्षालाचकाने कोरोना प्रादुर्भावाचा धोका ओळखून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनोखी शक्कल वापरली आहे. मागील दोन महिन्यांपासून सर्वत्र परिवहन बंद आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचा धंदा बंद झाला; आणि त्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली. मात्र हातावर हात ठेऊन बसण्यापेक्षा समोर असलेल्या परिस्थितीला तोंड देण्याचा निर्णय कल्याणच्या गफूर शेख याने घेतला.
सुरक्षित रिक्षा प्रवासासाठी त्याने रिक्षात खास सॅनिटायझरचे फवारे बसवले आहेत. विशेष म्हणजे सोशल डिस्टनस पाळून दोन प्रवासी बसण्याच्या ठिकाणी हे सॅनिटायजरचे फवारे लावण्यात आले आहेत. तर रिक्षामध्ये बसण्यापूर्वी हाताला सॅनिटायजर लाऊनच प्रवेश दिला जातो. पैसे घेण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये कमीत कमी संपर्क येईल, आणि कोरोनाचा धोकाही टळेल, अशा प्रकारची खबरदारी घेण्यात आली आहे. कोरोनासोबतच राहण्याची मानसिकता तयार करण्याचे आवाहन सरकरकडून करण्यात आले आहे. आता गफूर शेखसारखे आपली जबाबदारी ओळखून त्याप्रमाणे रिक्षा सज्ज केलीय.