ठाणे- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्ष निवडणुकीला सज्ज झाले आहेत. 2014 च्या निवडणुकीत हार पत्करलेल्या मतदारसंघावर भाजपचा डोळा असून कळवा-मुंब्रा गड महायुती काबीज करणार, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाण्यात केले. तसेच 'अबकी बार 220 पार' असे मत भातखळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे-कोकण विभागाच्या 'मीडिया सेंटर' चे उद्घाटन भातखळकर यांच्या हस्ते भाजप कार्यालयात करण्यात आले. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी दोन हात करून ही जागा आपल्या ताब्यात कशी येईल याची रणनीती आखली आहे.
दरम्यान, एकीकडे युतीच्या जागावाटपाचा तिढा असून सुटलेला नसून युतीवर येत्या दोन दिवसात शिक्कामोर्तब होईल, असे विधान देखील अतुल भातखळकर यांनी ठाण्यात केले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेत काय दिवे लावले आणि खोटे व्हिडिओ लावून जनतेचा भ्रम होणार नाही. जनता ही विकासाच्या मुद्द्यावर अनुभवत आहे. त्यामुळे अशा अपप्रचाराला जनता बळी पडत नाही, असा टोला राज ठाकरे यांना लगावला.