ठाणे- दुचाकीवरून जाणाऱ्या मित्रावर पाळत ठेवून त्याला जीपने जोरदार धडक दिली. तो रस्त्यावर पडताच कारने धडक देणाऱ्या 5 जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडने त्याच्यावर खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील येवई गावच्या हद्दीतील खोडियार मंदिरासमोर घडली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भालचंद्र सखाराम लोखंडे (वय 38 वर्षे, रा.उंबर्डे) असे खुनी हल्ला झालेल्या मित्राचे नाव आहे. तर उमेश कारभारी व कबीर कारभारी, असे अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे असून यातील तीन हल्लेखोर फरार झाले आहेत.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जखमी भालचंद्र लोखंडेचे आठ दिवसांपूर्वी आरोपी मित्रांसोबत किरकोळ कारणावरून वाद होवून भांडण झाले होते. त्यावेळी भालचंद्र याच्या मारहाणीत उमेश कारभारी ( वय 29 वर्षे, रा. कोळीवली, कल्याण) हा गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून राग धरून असलेल्या आरोपी उमेश याने अन्य मित्रांसोबत संगनमत करून भालचंद्र हा भिवंडी तालुक्यातील पडघा येथे गोदामात कामाला येत असल्याने त्याच्यावर पाळत ठेवून होता. तो दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाला असता त्याचा पाठलाग करून मुंबई-नाशिक महामार्गावरील येवई गावच्या हद्दीतील खोडियार मंदिरासमोर येताच पाठीमागून जीपने जोरदार धडक दिली. त्या धडकेत तो दुचाकीसह रस्त्यावर खाली पडला. त्यानंतर उमेश कारभारी व कबीर कारभारी या दोघांनी त्यांच्या अन्य तीन मित्रांसह लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला चढवून त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या भालचंद्र यास आसपासच्या नागरिकांनी उपचारासाठी बेशुद्धावस्थेत पिंपळघर येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
या खुनी हल्ल्याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात उमेश कारभारी याच्यासह 5 जणांच्या विरोधात भा. दं. वि. कलम 307, 326, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून यातील हल्लेखोर उमेश कारभारी व कबीर कारभारी या दोघांना पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे, पोलीस शिपाई आनंदा पाटील आदींच्या पोलीस पथकाने आज (दि. 28 डिसें.) मोठ्या शिताफीने कल्याण परिसरात सापळा लावून ताब्यात घेतले आहे. या दोघांना रविवारी (दि. 29 डिसेंबर) भिवंडी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा - ठाण्यात मेडीकलमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद