ठाणे - भिवंडी शहरातील हनुमान टेकडी परिसरातील एका घरात पती पत्नीवर अज्ञाताने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी आहे. काशिनाथ बर्डे (वय ५०) असे मृत पतीचे नाव असून अनुसया (वय ४५) असे जखमी पत्नीचे नाव आहे. सध्या जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हनुमान टेकडी परिसरात पती-पत्नीवर अज्ञाताचा हल्ला भिवंडी शहरातील आसबीबी या रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची वस्ती आहे. याच वस्तीतल्या एका घरात मृत काशिनाथ व त्याची पत्नी अनुसया हे दोघे राहत होते. आज (शुक्रवार) सकाळी उशिरापर्यंत त्यापैकी कोणीही बाहेर न आल्याने शेजारी राहणाऱ्या महिलेने दरवाजा उघडून त्यांच्या घरात डोकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी, घरात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले, या बातमीने संपूर्ण वस्तीत एकच खळबळ उडाली होती.
हेही वाचा - भिमा-कोरेगावसह मराठा मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा निदर्शने
त्यानंतर स्थानिकांनी भिवंडी शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन सर्वप्रथम जखमी अवस्थेत असलेल्या अनुसयाला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात हलविले. परंतु, तिच्यावर ४ ते ५ वार करण्यात आले असल्याने तिला पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर, मृत काशिनाथ बर्डे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. काशिनाथची हत्या ही डोक्यात जड वस्तूचा प्रहार करून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अनुसया ही शुक्रवारी वैजापूर येथील गावी जाणार असल्याने तिने गुरुवारी काही सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली होती. तसेच जमा केलेली काही रोख रक्कम देखील तिच्याजवळ असल्याची माहिती स्थानिक महिलांकडून दिली जात आहे. त्यामुळे ही हत्या का व कोणी, कोणत्या कारणासाठी केली? याचा तपास स्थानिक शहर पोलिसांसोबतच गुन्हे शाखेचे पथक करीत आहे.
हेही वाचा -ठाण्यात तोतया पोलिसांनी केले वयोवृद्धाचे सोन्याचे दागिने लंपास
घटनास्थळावरील रक्ताचे नमुने व इतर बाबींचा तपास कारण्यासाठी ठसे तज्ज्ञाचे पथकसुध्दा घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तपास सुरू केला असून भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.