ठाणे - एटीएम मशीनमध्ये वयोवृध्दांच्या हातातील एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून लुबाडणाऱ्या दोन चोरट्यांना कासारवडवली पोलिसांनी 72 तासांच्या आत मुद्देमालासह अटक केली आहे. चोराने एटीएम कार्डाद्वारे 19 हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली.
Video: 'एटीएम'मध्ये हातचलाखी करत वृद्धांना लूटले - एटीएम चोरी
गियासुद्दीन सिद्दीकी, शहेजान रहेमान या दोन आरोपींनी ज्येष्ठ नागरिकांना गोड बोलून एटीएमची अदलाबदल केली व त्यानंतर रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.
ज्येष्ठ नागरिक सदानंद वैद्य हे घोडबंदर येथील कॉर्पोरेशन बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे काढल्यानंतर एक अनोळखी व्यक्ती तिथे आला आणि त्याने ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्या हातातील एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर एटीएम कार्डाद्वारे 19 हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली.
याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर अशाप्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध कारागृह तसेच इतर पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन करण्यात आला. हे चोरटे कुर्ला, साकीनाका, नवी मुंबई येथील असल्याची माहिती मिळाल्यानं वेगवेगळी पथके पाठवून त्यांना शोधण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी या प्रकरणातील गियासुद्दीन सिद्दीकी, शहेजान रहेमान हे दोघे मुंब्र्याला येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील 4 मोबाईल व काही रक्कम असा 1 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्यांच्या चौकशीत त्यांच्याकडून विविध बँकांची 55 हून अधिक एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. हे दोघे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात अशाप्रकारचे 20 गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा - डोळ्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला.. अन् कट मारला म्हणून त्याचाच डोळा निकामी झाला