ठाणे- टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांसाठी काही नियम शहरात लागू करण्यात आले आहेत. दुकाने सायंकाळी सातपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर मनपातर्फे कारवाई करण्यात येत आहे. अशात मीरारोड प्रभाग ६मधील एक मनपा कर्मचारी चक्क दारू पिऊन व्यावसायिकावर कारवाई करत असल्याचे समोर आले आहे.
भाईंदर पूर्व बी.पी रोड, राहुल पार्क, भाईंदर पश्चिममधील खाऊ गल्ली, ९० फिट रोड, ६० फिट रोड, मीरारोडमधील अनेक व्यावसायिक टाळेबंदीच्या नियमांना बगल देत रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांची दुकाने उघडी ठेवत असल्याचे दिसून आले आहे. मनपा कर्मचारी, पोलीस प्रशासन व्यावसायिकांकडून हफ्ते घेऊन त्यांना पाठीशी घालत आहे. अशात, प्रभाग ६ मधील मनपा कर्मचारी रवींद्र सानप चक्क दारू पिऊन २ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह एका व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई करताना दिसले. या प्रकरणी व्यावसायिकाने काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.