ठाणे :पत्नी रात्रीच्या सुमारास असताना पतीकडून राहत्या घरातच प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कल्याण - पडघा मार्गावरील बापगावात घडली आहे. याप्रकरणी गंभीर जखमी पत्नीच्या भावाने हल्लेखोर पतीविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांनी राजकीय दबावाखाली आरोपीवर भादंवि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल न करता ३२६, ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचा आरोप तक्रारदार भावाने केला आहे. गणेश सुरेश चव्हाण (वय ४३) असे तक्रारदार भावाचे नाव आहे. तर प्रकाश शंकर पाटील ( वय ४५) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर पतीचे नाव आहे. तसेच सपना (वय ३९) असे प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे.
Thane Crime : पत्नी झोपेत असताना पतीकडून प्राणघातक हल्ला; पत्नीची प्रकृती चिंताजनक - Assaulted by husband while the wife
भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे पत्नी झोपली असताना पतीकडून प्राणघातक हल्लाची घटना घडली आहे. पत्नीची प्रकृती चिंताजनक असुन पतीविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीला बेदम मारहाण :तक्रारदार गणेश हे कल्याण पूर्वेत राहत असून त्यांची बहिणी सपना हिचा विवाह २००७ साली आरोपी पती प्रकाशशी झाला होता. त्यांना एक चार वर्षाचा मुलगा आहे. त्यातच १३ मे रोजी पत्नी सपना ही बापगावमधील राहत्या घरात रात्रीच्या सुमारास झोपली होती. त्यावेळी हल्लेखोर आरोपी पतीने अचानक पत्नीवर लाकडी दांडक्याने हल्ला केला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडेपर्यंत पतीने तीला बेदम मारहाण केली. दुसरीकडे पत्नीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. सासू, नणंदच्या मदतीने गंभीर जखमी अवस्थेत पत्नीला कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तक्रारदार गणेशला आरोपी पतीच्या नातेवाईकांनी बहीण सपना रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच रात्रीच भाऊ रुग्णालयात पोहचला. त्यावेळी सपनाची सासू, नणंद बापगावला घरी निघून गेल्या होत्या.
रविवारी १४ मे रोजी गणेशने पडघा पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या प्राणघातक हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पती विरोधात भादंवि कलम ३२६, ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. मात्र, पोलीस आरोपीला राजकीय दबावापोटी पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदार गणेशने केला आहे. वास्तविक सपनावर प्राणघातक हल्ला करूनही पोलिसांनी ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला नसल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. सद्या पत्नीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे येथील डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तर, संदर्भात पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साबळे यांच्याशी संपर्क साधला असता, डॉक्टरकडून मारहाणीचा अहवाल आल्यानंतर तपास करून पुढील कारवाई करून वाढीव कलम लावण्यात येणार असल्याचे सांगितले.