ठाणे - राज्यातील सरकार हे विद्यार्थीद्रोही सरकार आहे. जवळपास साडेतीन लाख एटीकेटी आणि रिपीटर विद्यार्थ्यांना नापास करण्याचे पाप हे सरकार करत आहे. निर्णय जाहीर केल्यानंतर आता त्याच्यावर अभ्यास हे सरकार करतेय, असा घणाघात भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला. ते ठाण्यात बोलत होते.
भाजप आमदार आशिष शेलार हे पक्षाच्या कामानिमित्त ठाण्यात आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी बातचीत करताना हे घणाघाती आरोप राज्य सरकारवर केले. राज्याच्या जनतेच्या हिताच्या मागण्या 'जोगवा मागणे' म्हणजे विरोध असा चष्मा सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. तो त्यांनी काढावा, असा आरोप करत केंद्रावर तोंडसुख घेताना राज्यात काय सुरू आहे, याबाबत स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून, असा शाब्दिक हल्ला शेलार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. ॲानलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे. हे खरं असले तरीही ॲानलाईन शिक्षणाबाबत राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे, त्याबाबत सर्वांचे विचार जाणून निर्णय घ्यावा, अशी सुचना शेलार यांनी राज्य सरकारला दिली आहे.