ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गेल्या काही महिन्यापासून दिवसेंदिवस सत्ताधारी आणि विरोधकांच्या विविध आरोप प्रत्यारोपाच्या घटना घडत असतानाच मागील आठवड्यात ठाण्याच्या बड्या नेत्याच्या गृहिणी ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या सुप्रसिद्ध मिठाईच्या दुकानात गेल्यावर त्यांना दुकानाबाहेर वाहन उभे करण्यावरून वाहनचालक आणि दुकानाचे सुरक्षारक्षक यांच्यात वाद झाल्याची घटना घडली. यादरम्यान अवघ्या तासाभरात ठाणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने या मिठाईच्या दुकानावर कारवाई केल्याने या घटनेचे ठाण्यात सर्वत्र राजकीय पडसाद उमटले. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीकेचा भडीमार केल्यानंतर दुसरीकडे सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानात चक्क मिठाईचा आस्वाद घेतल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महापालिकेने 25 मे रोजी ठाण्यातील बड्या नेत्याची गृहिणी दुकानात गेल्यावर झालेला वाद पाहता ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानात अवघ्या अर्ध्या तासात ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे कर्मचारी तिथे पोहोचले. त्यांनी थेट, ‘प्रशांत कॉर्नर’ दुकानाच्या बाहेरील निवारा शेड व इतर बांधकाम उध्वस्त केले, असा आरोप धर्मराज्य पक्षाचे ठाणे शहर संघटक अजय जया यांनी केला. याप्रकणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील उडी घेतली. त्यांनीही ट्विटरच्या माध्यमातून ठाण्यातील बड्या नेत्याच्या गृहिणीवर टीका केली. मात्र कारवाईनंतर तब्बल चौथ्या दिवशी प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानाचे मालक प्रशांत सकपाळ यांनी या प्रकरणी कोणत्याही बड्या नेत्याच्या पत्नीचा संबंध नसल्याची सारवासारव केली. तसेच धर्मराज्य पक्षाचे अजय जया यांच्या आरोपाप्रकरणी आपल्याला गुंतवण्यासाठी अजय जया यांनी केलेल्या कारस्थानविरोधात प्रशांत सकपाळ यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. परंतु, जया यांनी केलेले सर्व आरोप निराधार, खोडसाळ असून अशी कोणतीही घटना घडलीच नसल्याचे प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी स्पष्ट केले आहे.