भांडयांना कलई करुन ओढतेय संसाराचा गाडा ठाणे Kalai Story : पूर्वीच्या काळी पितळ आणि तांब्याचे मोठे टोप, कढई व इतर भांडी काळी पडली की त्याला कलई करुन परत नव्यासारखी लकाकी आणली जात असे. परंतु आता स्टेनलेस स्टील आणि इतर धातूच्या भांड्यामुळं पितळ तांब्यांची भांड्यांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. परिणामी या भांड्यांना कलई करण्याची कलादेखील लोप पावत आहे. परंतु कर्जत इथं राहणाऱ्या काशीबाई म्हस्के या आपल्या आईकडून शिकलेली कला जिवंत ठेवून आपल्या संसाराचा गाडा ओढताना दिसत आहेत. संपूर्ण संसाराचा संपूर्ण भार काशीबाई यांच्यावर पडल्यानं त्या गेली 40 वर्षे हा व्यवसाय त्या नेटानं करत आहेत.
40 वर्षांपासून व्यवसाय सुरु : "कलई लावा कलई" अशी आरोळी ठोकत पूर्वी कलईवाले गावोगावी आणि शहरा-शहरात फिरत असतात. अत्यंत मेहनतीनं टोप, कढ्या व इतर तांब्या पितळेची भांडी ही मंडळी लीलया चमकवून देतात. त्यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया पाहणं ही देखील एक करमणूक असायची. परंतु, स्टेनलेस स्टील आल्यानं तांबे आणि पितळेची भांडी डोकेदुखी ठरू लागली. शेकडो रुपये खर्च करणं अनेकांना परवडेनासं झाले.. त्यामुळं कलई करणारी मंडळीदेखील उदरनिर्वाहासाठी इतर व्यवसायाकडे वळली. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतदेखील ही महिला आपल्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी या व्यवसायाची कास सोडायला तयार नाही. काशीबाई राजू म्हस्के या 50 वर्षीय अशिक्षित महिलेनं वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ही कला आपल्या आईकडून आत्मसात केली. त्यानंतर आता गेली जवळपास 40 वर्षे त्या हे काम अत्यंत सचोटीनं करत आहेत.
कलईला लागतात पाचशे ते सहाशे रुपये: कर्जतवरुन जवळपास दोन तासांचा प्रवास करुन त्या ठाणे पूर्व येथील अष्टविनायक चौकात येतात. कॉस्टिक सोडा आणि नवसागर वापरुन त्या भांड्यांना अशी कलई करतात की, भांडी लख्ख नव्याप्रमाणं चमकतात. एक मोठा टोप कलई करायचे त्या पाचशे ते सहाशे रुपये घेतात. एकदा चांगली कलई केली की पुन्हा दोन-चार वर्षे कलईची गरज पडत नाही, अशी माहिती काशीबाईंनी दिली.
- का करतात भाड्यांना कलई? : तांबं आणि पितळेची भांडी कालांतरानं काळी पडतात. त्यानंतर खराब दिसू लागतात. त्यावर ऑक्ससाईडचा थर साचून भांड्यांचं आयुष्यमान कमी होतं. अशी भांडी सहजरीत्या स्वच्छ होत नाहीत. भांडी स्वच्छ झाली तरीही ही चकाकी जास्त काळ टिकत नाही. यावर अशा भांडयांना कलई करणे हा एकमेव पर्याय उरतो.
व्यवसाय डबघाईला का आला : पूर्वी तांब्या पितळेच्या भांडयांना प्राधान्य दिलं जायचं. सर्वच घरांमध्ये हीच भांडी प्रामुख्यानं पहायला मिळतं. परंतु कालांतरानं स्टीलच्या भांड्यांनी स्वयंपाकघरांवर ताबा मिळवला. स्टील आणि इंडक्शनची भांडी त्यामानानं स्वस्त आणि वजनाला हलकी असल्यानं ही भांडी वापरात आली. त्यामुळे कलईवाल्यांची उपासमार सुरू झाली. अवजड भांड्यांना सोपा पर्याय उपलब्ध झाल्यानं स्टीलची भांडी खरेदी करणं सर्वजण पसंत करतात. या सर्व कारणांमुळं तांब्यासह पितळेच्या भांड्यांना कलई करणं बंद होऊ लागली आहे.
हेही वाचा :
- 35 प्रकारच्या शेवंतीनं बहरलं घरचं अंगण; रोज चार तास बागकाम करून सेवानिवृत्त डॉक्टर जपतात 'छंद फुलांचा'
- बांबूनं आणली समृद्धी; मेळघाटातील राहू गावच्या आदिवासींची रोजगारासाठी थांबली भटकंती
- Special story of stone Exhibition : ते मुलांच्या डोक्यात भरतायत दगड; मध्य मुंबई विज्ञान संघाचे प्रदर्शन