नवी मुंबई - कोरोनाने एपीएमसी मार्केटमध्ये शिरकाव केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नवी मुंबईत अत्यावश्यक सेवे व्यक्तिरिक्त कोरोनाबाधित रुग्ण हे एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत व्यक्ती व त्यांचे निकटवर्तीय आहेत. कोरोनाचा वाढता कहर पाहता एपीएमसी प्रशासन आणि व्यापाऱ्यांनी एपीएमसी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून, एपीएमसी मार्केट 7 दिवस बंद राहणार आहे.
सोमवार पासून 7 दिवस एपीएमसी मार्केट बंद हेही वाचा-बापरे! आर्थर रोड कारागृहात 77 कैदी, 26 कर्मचाऱ्यांसह तब्बल 103 जणांना कोरोनाचा संसर्ग
एपीएमसी मार्केटमध्ये दिवसागणिक कोरोनाचा कहर वाढत आहे. आतापर्यंत एपीएमसी मार्केटमध्ये 117 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एपीएमसी मार्केटच्या माध्यमातून कोरोना जलद गतीने पसरत आहे. फळ मार्केट, भाजीपाला मार्केट, मसाला मार्केट, दाना मार्केट व कांदा बटाटा मार्केट असे एकूण पाच मार्केट एपीएमसीमध्ये आहेत. या पाचही मार्केटमध्ये दिवसाला हजारोंच्या संख्येने लोकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे एपीएमसी मार्केटच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण वाढत आहे.
त्यामुळे येत्या सोमवार पासून, 11 मे ते 17 मे दरम्यान पुढील 7 दिवस एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, परिमंडळ 1 उपायुक्त पंकज डहाणे, माथाडी नेता नरेंद्र पाटील, आणि पाचही बाजार समितीचे संचालक उपस्थित होते. या सात दिवसाच्या काळात व्यापारी आणि कामगारांची स्क्रीनिंग होणार असून पाचही बाजारांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.