ठाणे :2020 मध्ये कोरोनाची सुरुवात झालेली असताना घराबाहेर दिवे लावण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला होता आणि दिवे लावणारे मूर्ख आहेत, असे विधान केले होते. त्यांच्या विधानाला ठाण्यातील अनंत करमुसे या व्यक्तीने विरोध करताच त्यांचे आपल्या अंगरक्षकांकरवी अपहरण करून आव्हाड यांनी बेदम मारहाण केली होती. त्यावेळी जितेंद्र आव्हाड स्वतः मंत्री असल्याने सर्व तेरा आरोपींना त्वरित जामीन मिळवून दिला होता, असा आरोप करत करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक तपास यंत्रणांना घटनेचा तीन महिन्यात तपास करून स्थानिक न्यायालयासमोर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सत्तेच्या धुंदीत सर्वसामान्यांवर अन्याय करणाऱ्या विरोधात आपल्या लढ्याला यश आले आहे, असे सांगत करमुसे यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले.
काय आहे पूर्ण प्रकरण?जितेंद्र आव्हाड हे राज्यामध्ये मंत्री पदावर असताना ट्विटरवर केलेल्या त्यांच्यावरील अश्लील टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी अनंत करमुसेला घरातून बोलावून बंगल्यावर नेले आणि मारहाण केली होती. या प्रकरणी अनंत करमुसे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर करमुसे यांना कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीच्या विरोधात जितेंद्र आव्हाड यांचा पोलीस बॉडीगार्ड आणि स्वीय सहाय्यक यांच्यावर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला होता. यासंदर्भामध्ये मागील अनेक महिन्यांपासून न्यायालयीन लढाई सुरू होती.