ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणारी डिझायनर उल्हासनगर शहरात राहणारी आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बुकी अनिल सिंघानिया यांच्या मुलीने त्यांना ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. अनिक्षा सिघांनी असे तीचे नाव असून तिचे वडील गेल्या 8 वर्षांपासून पोलीस रेकॉर्डवरून फरार आहेत. या प्रकरणातील आरोपी अनिक्षा सिंघानियाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच सिंघानिया यांच्या उल्हासनगरमधील राहत्या घरावर पोलिसांनी छापे टाकले आहे. मुंबई पोलिसांचे पथक उल्हासनगर शहरातील अनिक्षाच्या घरात दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी अनिक्षा, तिच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. मलबार हिल पोलिसांनी अनिक्षा, तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 120-बी ( षड्यंत्र ) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
डिझायनरविरोधात पोलिसांत गुन्हा :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, आरोपींनी पैशांची ऑफर देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच अमृता फडणवीस यांना गुन्हेगारी प्रकरणात हस्तक्षेप करण्याची धमकी दिली होती. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिस ठाण्यात 20 फेब्रुवारी रोजी प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे. अनिक्षा सिंघानिया असे आरोपी केलेल्या डिझायनरचे नाव आहे. ती काही काळापासून फडणवीस यांच्या संपर्कात होती. आरोपी अनेकदा फडणवीसांच्या घरीही गेली होती. डिझायनर अनिक्षा अमृता यांना व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स, टेक्स्ट मेसेज पाठवून धमकावत होती.
भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल:पोलिसांनी अनिक्षा, तिच्या वडिलांविरोधात षडयंत्र, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. एफआयआरनुसार, अनिक्षा गेल्या 16 महिन्यांपासून अमृता फडणवीसांच्या संपर्कात होती. पोलिसांना दिलेल्या निवेदनात अमृता फडणवीस यांनी सांगितले की, त्या नोव्हेंबर 2021 मध्ये अनिक्षाला पहिल्यांदा भेटल्या होत्या.