ठाणे :अंबरनाथ शहरातील प्राचीन शिव मंदिराच्या मैदानात रामकथा आणि हनुमान कथेला आज सायंकाळी सुरुवात होणार आहे. मात्र, यापूर्वीच कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होईल असे वक्तव्य बागेश्वर बाबाने करू नये. यासाठी पोलिसांनी बागेश्वर धाम सरकारला नोटीस बजावली आहे. शहरात कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होईल वक्तव्य बागेश्वर बाबाने करु नये यासाठी वंचित बहुजन आघाडीने पोलिसांना पत्र दिले होते. त्या पत्राच्या आधारे शिवाजी नगर पोलिसांनी बागेश्वर बाबाला आयपीसी कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावली आहे.
बागेश्वर बाबा कायमच चर्चेत : या प्रवचनाला दोन ते अडीच लाख भाविक उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. मात्र, आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायमच चर्चेत असणारे बागेश्वर बाबा अंबरनाथमध्ये नेमके काय वक्तव्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्याचबरोबर लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची कोणती व्यवस्था आयोजकांनी केली आहे हे देखील पाहणे महत्वाचे आहे. यापूर्वी शिवामांदिर फेस्टीव्हलसाठी शिवमंदिराच्या प्रांगणात झालेली गर्दी देखील पोलिसांना आवरणे मुश्किल झाले होते. यामुळे पोलीस या कार्यक्रमाला होणारी गर्दीवर कसे नियंत्रण ठेवणार हे महत्वाचे आहे.