नवी मुंबई -मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाजार पूर्णपणे बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, एपीएमसीमधून मुंबई महानगर क्षेत्रात पुरवठा होत असल्याने एपीएमसी बंद करणे अशक्य असल्याचे नवी मुंबईचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले आहे.
कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत असले तरी एपीएमसी मार्केट पूर्णपणे बंद करणे अशक्य..!
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे (एपीएमसी) नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. ही बाब एकीकडे असताना दुसरीकडे एपीएमसीमध्ये ढिसाळ कारभारही सुरू आहे. फळ व भाजीपाला मार्केट मध्ये 150 गाड्याची परवानगी असताना भाजीपाला बाजारात 222 व फळ मार्केटमध्ये आतापर्यंत 423 गाड्याची आवक झाली आहे.
7 दिवसापासून फळ, भाजीपाला व दाना मार्केटमध्ये कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यावर नियंत्रण ठेवले नाही तर पुढे गंभीर होणार आहे, ही स्थिती असल्याने एपीएमसी बंद करण्याची मागणी पुढे येत आहे. मात्र, एपीएमसी मधील रूग्णांची संख्या जरी वाढत असली तरी एपीएमसी मार्केट मात्र सुरूच राहणार आहे. कारण एपीएमसी मधूनच मुंबई महानगर क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा केला जात असल्याने एपीएमसी बंद करणे शक्य नसल्याचे नवी मुंबई आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी म्हटले आहे.
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी मधील सर्व व्यापाऱ्यांची पडताळणी करण्याच्या देखील आयुक्तांनी सूचना केल्या आहेत.
यामुळे एपीएमसी बंद करण्याची मागणी करणाऱ्यांना आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे.