ठाणे -शेतकरी संघटनांनी आज भारत बंद पुकारला आहे. याला समर्थन देण्यासाठी सर्व विरोधी पक्षीय पदाधिकारी एकत्र येऊन मुरबाड तहसिलदार कार्यालयासमोर धरणे व प्रदर्शन आंदोलन केले. तसेच निवेदन तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
हेही वाचा -अघोरी कृत्य.. वाईजवळ अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत नेऊन पूजनाचा प्रकार, मांत्रिक फरार
- चुकीच्या धोरणामुळे ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी -
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी झाली आहे. त्या विरोधात भारत बंदच्या रुपाने एल्गार पुकारलेला आहे. जर सरकारला जाग आली नाही तर भविष्यात पुन्हा तीव्र आंदोलन करू, असा इशारा मुरबाड तालुका काँग्रेस अध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी दिला आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीपी गॅस, खाद्यतेलाचे दर प्रचंड महाग झाले असून, लोकांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे पाप मोदी सरकारने केले असल्याचे मत अॅड. तुळपुळे यांनी व्यक्त केले.
- आंदोलनात जवळपास ५०० शेतकऱ्यांचे निधन -
दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी वर्षभरापासून ठाण मांडून बसलेले आहेत. या आंदोलनात जवळपास ५०० शेतकऱ्यांचे निधन झाले. परंतु केंद्रातील कुंभकर्णी सरकारला मात्र या शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही, अशी शोकांतिका राम दुधाळे यांनी व्यक्त केली. कामगार कायद्यात बदल करून कामगारांचे हक्क व अधिकार काढून घेतले आहेत व नवीन कामगार कायदेसुद्धा उद्योगपती धार्जिणे बनवण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केल्याचे दिपक वाघचौडे यांनी प्रतिपादन केले.
- महागाईच्या मुद्द्यावर जनतेत तीव्र असंतोष-
देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे, कामगारविरोधी कायदे, वाढती बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यावर जनतेत तीव्र असंतोष असल्याचे मत दिलीप धनगर यांनी व्यक्त केले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, श्रमिक मुक्तीच्या ॲड.इंदवी तुळपुळे, शिवसेना शहरप्रमुख राम दुधाळे, सेवादलचे जिल्हाअध्यक्ष नरेश मोरे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दिपक वाघचौडे, रिपाइ सेक्युलरचे तालुकाध्यक्ष दिलीप धनगर, प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद पाटील, किसान सभेचे तालुकाध्यक्ष नारायण पाटोळे, महिला काँग्रेच्या संध्या कदम, अनिल चिराटे, अविनाश भोईर, शुभांगी भराडे, विलास जाधव, हर्षद शेळके, शाम माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -चिथावणीखोर भाषण न करता संयमाने दौरा करावा, सोमैया यांना ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांचा सल्ला