रचना वैद्य यांना आनंद परांजपेंची धमकी ठाणे :आनंद परांजपे यांना सोडून कशाला जाते. तू इकडे आनंद सोबत ये नाहीतर जीवानिशी जाशील, अशी धमकी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील रचना वैद्य यांना अजित पवार गटातील ठाण्याचे शहर अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीने दिली. याप्रकरणी वैद्य यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून नौपाडा पोलिसांनी परांजपे दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीच्या फोनवरुन जीवे मारण्याची धमकी :आनंद परांजपे हे अजित पवार गटाचे ठाणे शहराध्यक्ष आहेत. परांजपे जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू मानले जात होते. परंतु त्यांनी आव्हाडांची साथ सोडत अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. ठाण्यात अजित पवार गटाचे वर्चस्व राहावे, यासाठी कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. परंतु कार्यकर्त्यांना आपल्या गटात आणण्यासाठी पदाधिकारी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. अजित पवार गटात गेलेले आव्हाड यांचे विश्वासू आनंद परांजपे यांनी आणि त्यांच्या पत्नीने मोबाईल फोनवरुन शरद पवार यांच्या गटातील महिला कार्यकर्त्या रचना वैद्य यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप वैद्य यांनी केला आहे.
काय म्हणाल्या रचना वैद्य :या धमकी प्रकरणी रचना वैद्य आणि जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना रचना वैद्य म्हणाल्या की, पक्ष कार्यालयात असताना 3 जुलै रोजी 3 वाजून 18 मिनिटांनी आनंद परांजपे आणि सोनल परांजपे यांचा फोन आला. त्यात त्या म्हणाल्या की,आनंदकडे इकडे जास्त स्कोप आहे. गुंडासोबत का राहतेस? असे म्हणत त्यांनी मुलाचे बरेवाईट करू, अशी धमकीही परांजपे दाम्पत्याने दिली.
आनंद परांजपे यांच्यावर गुन्हा दाखल : शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास परांजपे यांनी रचना वैद्य यांना मोबाईलवरुन कॉल केला. त्यावेळी आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नीने वैद्य यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप रचना वैद्य यांनी केला आहे. फोनवर आनंद परांजपे यांच्या पत्नी सोनल परांजपे म्हणाल्या की, आनंदला सोडून कशाला तिकडे राहते. आनंद सोबत इकडे ये, नाहीतर जीवानिशी जाशील, असे रचना वैद्य यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन नौपाडा पोलीस ठाण्यात सोनल आनंद परांजपे आणि आनंद प्रकाश परांजपे यांच्याविरोधात भादंवि 502 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हाटेकर यांनी दिली.
हेही वाचा-
- Maharashtra Political Crisis : शरद पवार पक्षाचे अध्यक्ष तर पटेल-तटकरेंवरील कारवाई मान्य आहे का, जितेंद्र आव्हाडांची रोखठोक सवाल
- Thane Crime : आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरण; अभिजित पवार याच्यानंतर आव्हाड समर्थक हेमंत वाणी २ वर्षाकरता हद्दपार