ठाणे - आम्ही १५ वर्षे राज्य केले, मात्र कधीही सुडाचे राजकारण केले नाही. या भाजप सरकारने पवार साहेबांना कुठलाही संबध नसताना ईडीची नोटीस बजावून लोकशाहीला नख मारण्याचे काम केले आहे, अशी टीका अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.
आमदारकीचा राजीनामा आणि ईडीच्या घडलेल्या नाट्य घडामोडीनंतर पहिल्यांदाच अजित पवारांनी मुरबाडमधील जाहीर सभेत भाजप सरकारवर सडकून टीका केली. ते मंगळवारी मुरबाड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. यावेळी मुरबाड शहरात प्रचाराच्या रॅलीने सुरुवात करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मुरबाड मधील एका सभागृहात अजित पवार यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, त्यांचेच आमदार म्हणतात दारूला बाईचे नाव द्या म्हणजे दारू खपेल, तर आमच्या वेळी आर. आर. आबांनी डान्सबारवर बंदी घातली होती. त्यानंतर गुटख्यावरही बंदी घातली होती. आता यांच्या राज्यात काय सर्वच सुरू आहे.