ठाणे - पत्नीची तिच्या प्रियकरासोबत नग्नावस्थेतील मोबाईलवर व्हिडिओ क्लिप पाहताच पतीने पत्नीची चाकूने सपासप वार निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना भिवंडीतील नागांव रोडवरील एका चाळीत घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे पत्नीची हत्या करून पती स्वतःच पोलीस ठाण्यात धरदार रक्ताने माखलेल्या चाकूसह हजर झाला.
याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीने पत्नीची हत्या केल्याची 10 महिन्यात भिवंडीतील ही पाचवी घटना आहे.
अशी घडली घटना
भिवंडी शहरातील अंसारनगर परिसरातील एका चाळीत आरोपी हा मृत पत्नी आणि तीन मुलांसह 16 ते 17 वर्षांपासून राहत होता. आरोपी पती हा टाळेबंदीच्या काळात बेरोजगार झाला होता. त्यामुळे आर्थिक अडचणीतून जात असताना तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून या पती-पत्नीमध्ये रोज भांडणे होत होती. त्यामुळे ती पतीला सोडून भिवंडीतील नागांव रोडवरील गैबी नगर परिसरात राहत असलेल्या तिच्या बहिणीच्या घरी राहत होती. या दरम्यान मृत पत्नीचा प्रियकर सद्दाम याने आरोपीच्या पत्नीसोबत नग्नास्थेतील एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली होती. हिच व्हिडिओ क्लिप पाहून आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नी राहत असलेल्या तिच्या बहिणीच्या घरी मंगळवारी (दि. 3 नोव्हेंबर) रात्री 7 ते 8 वाजल्याच्या सुमारास जाऊन तिची धारदार चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर स्वतःच पोलीस ठाण्यात चाकूसह हजर होऊन त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दुसरीकडे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर मृत महिलेच्या बहिणीने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा हत्येचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर करीत आहेत.
- भिवंडीत गेल्या 10 महिन्यात पाचवी घटना
- भिवंडी शहरातील गायत्रीनगर येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी अँगल मारून निर्घृण हत्या केली होती.
- भिवंडी तालुक्यातील पूर्णा या गावात शुल्लक वादातून पतीने लोखंडी पाईप डोक्यावर, तोंडावर, पायावर मारून पत्नीची हत्या केली होती.
- भिवंडी तालुक्यातील पूर्णा येथे आपल्या पोटच्या अकरा महिन्याच्या चिमुरडीस पत्नीने स्तनपान करण्यास नकार दिल्याच्या रागातून गुरुद्वारात पुजारी म्हणून काम करणाऱ्या पतीने पत्नीच्या डोक्यात उभ्या पंख्याच्या खालील लोखंडी रॉड घालून हत्या केली होती.
- भिवंडी शहरातील श्रीरंग नगर परिसरात राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणात राग अनावर झालेल्या पतीने पत्नीच्या गळ्यास ब्लॅंकेट आवळून व तोंडावर उशी दाबून तिची हत्या केली होती.
- पत्नीची तिच्या प्रियकरासोबत नग्नावस्थेतील मोबाईलवर व्हिडिओ क्लिप पाहताच पतीने पत्नीची चाकूने सपासप वार निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना भिवंडीतील नागांव रोड वरील एका चाळीत घडली आहे.
दरम्यान, या पाचही घटना पाहता टाळेबंदीच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा -ऑनलाइन प्रेम पडलं महागात... सहा लाखांचा गंडा!