सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील निलरत्न ( Narayan Rane Nilratna Banglow ) या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने ( Ministry of Environment Forest and Climate Change Nagpur Office ) महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला आदेश दिले आहेत. नारायण राणेंच्या अधीश बंगल्याच्या पाहणीचा वाद ताजा असताना निलरत्न बंगल्याला ही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोकणात राजकीय वातावरण तापले आहे.
सीआरझेड २ चे उल्लंघन -
दरम्यान, काल नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, मुख्यमंत्री आणि मातोश्रीवर टीका केली होती. या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद आणखी पेटणार का? अशी चर्चा सध्या सुरू आहे.एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने नारायण राणे यांच्या मालवण येथील निलरत्न बंगला बांधताना सीआरझेड २ चे उल्लंघन झाले, अशी तक्रार ऑगस्ट २०२१ला केली होती. त्यानंतर तक्रारीची कॉपी आपल्याला मिळाल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिली आहे.
हेही वाचा -Chandrakant Patil On Sanjay Raut : 'संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचे कंत्राट घेतले'
दरम्यान, आता या कारवाईमुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा यांच्यात वाद वाढणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे भाजपा नेते वारंवार सांगत आहेत. यावरून शिवसेनेनही आपलं शाब्दिक हत्यार बाहेर काढत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांच्या मुंबई येथील अदिश बंगल्यासंदर्भात झालेल्या चौकशीनंतर आता निलरत्नचीही चौकशी करण्याचे आदेश आले आहेत. आता पुन्हा एकदा नारायण राणे यांचे पुढचे पाऊल काय असणार? याकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागून राहिले आहे.