नवी मुंबई - अनलॉक-१ मध्ये काही दुकानदार फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याचे समोर आले होते. तेव्हा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी अशा दुकानदारांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करणाऱ्या, ३२ दुकानदारावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
मिशन बिगिन अगेन अंतर्गत लाॅकडाऊन शिथील झाल्यापासून नागरिक मुक्त झाल्यासारखे दिसत आहेत. मात्र लाॅकडाऊन शिथील करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे व कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी मास्क व सॅनिटायझर्स यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे, असे वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी गर्दी न करता दैनंदिन जीवन सुरळीत करणे अपेक्षित आहे. परंतु या बाबीचे भान ठेवता काही दुकानदार बेजबाबदारपणे वागत असल्याने निदर्शनात आले. तेव्हा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी अशा दुकानदारांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश काढले.
आयुक्त देशमुख यांच्या आदेशानुसार, रविवारी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नियंत्रणाखाली फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, सम-विषम तारखांना दुकाने उघडे ठेवण्यासाठीचे नियम, अटी-शर्थीचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. संबंधित प्रभागातील प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी, प्रकाश गायकवाड, अरूण कोळी व सदाशिव कवठे यांच्या पथकांनी 32 दुकानदारांवर कारवाई करत दुकाने सील केली.