ठाणे : नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू असतानाच, गुन्हेगारांना सोन्याची अंडी देणाऱ्या उद्योग नगरी म्हणजेच उल्हासनगर पोलीस परिमंडळ मधील पोलीस ऑक्शन मोडवर असल्याचे दिसून आले. शेकडो गुन्हेगारांवर विविध गंभीर कायद्याच्या नियमानुसार कारवाई ( Action against hundreds of criminals ) करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळचे पोलीस उपआयुक्त डॉ सुधाकर पठारे ( DCP Dr Sudhakar Pathare ) यांनी दिली आहे. ( Thane Crime )
गुन्हेगार तडीपार होणार : उद्योग नगरी असलेल्या उल्हासनगर, तसेच औद्योगीक वसाहती असेलल्या अंबरनाथ, बदलापूर शहरात गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. त्यात गुन्हेगारांना सोन्याची अंडी देणाऱ्या शहरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातारण निर्माण केल्याने विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांनी नामचीन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये आठ पोलीस ठाण्यात संघटित गुन्हेगारांच्या १० टोळी विरोधात मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करून ६३ सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. तर एमपीडीए कायद्याअंतर्गत ५ नामचीन गुन्हेगारांना अटक करत त्यांना विविध कारागृहात टाकण्यात आले. तर दोन गुन्हेगारांवर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. शिवाय गुन्हेगारांचा कणा मोडून काढण्यासाठी वर्षभरात आतापर्यत ५४ गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. तर ५१ गुन्हेगारांना तडीपार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे.