ठाणे : तक्रारदार इंदू रणधीर सिंह (वय, ४२) ह्या भिवंडी तालुक्यातील कोनगाव मधील पिंपळास रोड वर असलेल्या सिद्धेश्वर पार्क मधील डी विंगच्या तिसऱ्या मजल्यावर राहतात. तर आरोपी पिंकी ही कोनगाव येतील नाईकवाडी भागात असलेल्या गिरधर नगरमध्ये राहते. दोघी एकाच मूळ राज्यातील असल्यामुळे त्यांच्यात ओळख होऊन मैत्री झाली. दोघीही एकमेकांच्या घरी येत जात होत्या. त्यातच तक्रादार इंदू यांच्या घरातील कपाटातून ११ ते १८ जानेवारी दरम्यान २ लाख ९१ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात १९ जानेवारी रोजी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला.
आरोपी पिंकी कर्जबाजारी :गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून त्यानुषंगाने कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक अस्लेशा घाटगे, पो.ह. अरविंद गोरले, अमोल गोरे, पोना गणेश चोरगे, नरेंद्र पाटील या पोलीस पथकाने तपास सुरू केला. चोरट्याचा कुठलाही सुगावा नसल्याने तक्रारदार इंदू यांच्याकडून घरातील नातेवाईक आणि मैत्रिणीची माहिती गोळा करून त्या दिशेने तपास सुरू केला. तपास दरम्यान आरोपी पिंकी ही कर्जबाजारी असल्याचे समोर आल्याने १९ जानेवारी रोजी पोलीस पथकाने तिला संशयित म्हणून तिची चौकशी सुरू केली.