ठाणे - प्रवासादरम्यान कार चालकाचा दोरीने गळा आवळून त्याचा खून तर केलाच. शिवाय पुरावेही नष्ट करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण खटल्याचा निकाल कल्याण न्यायालयाने 9 वर्षांनंतर दिला आहे. या चालकाच्या हत्येप्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 4 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आकाश साळुंखे, सचिन, सुभाष निचटे, काळुराम फर्डे अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. तर घनश्याम पाठक (53) असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.
मृतदेह फेकला होता कसारा घाटात
आरोपींनी 2012 मध्ये कल्याणमधील रेवणकर यांच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कार शिर्डीला जाण्यासाठी बुक केली होती. रेवणकर यांनी चालक घनश्याम पाठक (53) यांला शिर्डीला जाण्यासाठी सांगितले होते. कारमधील आकाश साळुंखे, सचिन, सुभाष निचटे, काळुराम फर्डे या चौघांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. शिर्डीला जाण्याआधीच त्यांनी ओतूरजवळ एक दोरी खरेदी केली होती. शिर्डीहून परत येताना कसारा घाटात कार पोहोचताच चालक घनश्याम पाठक याची दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह कसारा घाटात फेकून देण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेजमुळे लागला आरोपींचा शोध
या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला. चालक व कार गायब असल्याने टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या मालकाने पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळा कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक माहिती व शिर्डी येथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. यात 4 संशयितांबरोबर कार चालक घनश्याम पाठक हे देखील आढळून आल्याचे निष्पन्न झाले. मात्र, पोलिसांकडे या हत्येसंदर्भात प्रथमदर्शी पुरावा नसताना गुप्त बातमीदारांमार्फत व तांत्रिक तपासावर शहापूरमध्ये राहणाऱ्या चौघांना गजाआड करण्यात आले. अटक आरोपींमध्ये आकाश गजानन साळुंखे, सचिन ऊर्फ बटाट्या ऊर्फ सुभाष निचीते, सचिन ऊर्फ सच्या सुभाष निचीते व दिनेश काळूराम फर्डे या चौघांचा समावेश होता. हा खटला कल्याण न्यायालयात सुरू होता.
सबळ पुराव्यांमुळे जन्मठेप
मारेकऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी सबळ पुरावे गोळा केले होते. या हत्याकांडाच्या 9 वर्षानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सर्व मारेकरी शहापूरचे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी पुन्हा सापडला मृतदेह