ठाणे -एका कंपनीत कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगाराचे त्याच कंपनीच्या मालकाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. मात्र तिचे इतरांशीही प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून त्या कामगाराने तिच्या राहत्या घरात गळा चिरून निर्घृण हत्या केली होती. ही घटना अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ( Shivajinagar Police ) हद्दीत घडली होती. याच गुन्ह्यातील आरोपीला हत्येप्रकरणी दोषी ठरवत कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे ( Kalyan District Sessions Court ) न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. मनोरंजन उर्फ राखाल सिध्देश्वर महाकुड, असे जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या आरोपी कामगाराचे नाव आहे.
मालकाच्या पत्नीची किचनमध्ये निर्घृण हत्या :जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला मनोरंजन उर्फ राखाल हा मूळचा ओरिसा राज्यातील रहिवाशी असून तो अंबरनाथ शहरातील एका कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होता. तर ज्या कंपीनीत काम करत होता. त्याच कंपनी मालकाच्या अंबरनाथ पूर्व भागात असलेल्या घरासमोरच आरोपी कामगार राहत होता. कंपनीच्या काही कामानिमित्त आरोपीचे मालकाच्या घरी येत जात होता. यामुळे कंपनी मालकाच्या पत्नीशी ओळख झाली. त्यानंतर ओळखीतून कंपनी मालकाच्या पत्नीशी त्याचे अनैतिक संबंध निर्माण झाले. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यातच २४ मे २०१६ रोजी होळीच्या दिवशी कंपनी मालकाने घरासमोर त्याची पत्नी, त्यांच्या दोन मुलींसोबत होळी खेळण्याची तयारी केली. मात्र कंपनी मालकाच्या पत्नीने तब्येत ठिक नसल्याचे पतीला सांगत आपण होळी खेळणार नाही, असे सांगितले. त्यामुळे कंपनी मालक आणि त्यांचे दोन मुली घराबाहेर होळी खेळत होत्या. घराबाहेर होळी खेळून झाल्यानंतर कंपनी मालक अंबरनाथमध्ये राहत असलेल्या आपल्या मेव्हण्याच्या घरी दोन्ही मुलींना घेऊन होळी खेळण्यासाठी गेले. मामाच्या घरी रंगोत्सव करून कंपनी मालक आपल्या दोन्ही मुलींसह घरी आला. त्यावेळी त्यांना धक्का बसला. घरामधील किचनमध्ये पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यानंतर या घटनेची माहिती कंपनी मालकाने नातेवाईकांना दिली असता नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी कंपनी मालकाने २४ मे २०१६ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पत्नीच्या हत्येप्रकरणी तक्रार दाखल केली.