ठाणे: आरोपी मनोहर दामू सुरळकर यांचा मुलगा धम्मप्रिय (१९) हा एका हत्येच्या गुन्ह्यात २२ सप्टेंबर २०२१ रोजी जामिनावर सुटल्यानंतर वडिलांसोबत घरी जात होता. त्यावेळी जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली येताच शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर (वय २१ वर्षे) आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन (वय २१ वर्षे) या दोघा आरोपींनी धम्मप्रियवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात धम्मप्रिय जागीच ठार झाला होता. तर वडील मनोहर दामू सुरळकर जखमी झाले होते. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून हल्लेखोर शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन या दोघांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून दोघेही कारागृहातच आहेत.
ओळख लपविण्यासाठी घातला बुरखा: २० फेब्रुवारी रोजी धम्मप्रिय हत्या प्रकरणी जळगाव न्यायालयात सुनावली असल्याने आरोपी शेख समीर व रेहानुद्दीन नईमोद्दीन या दोघांना जळगाव न्यायालयात हजर करण्यात येणार होते. याची माहिती मृतक धम्मप्रिय याचे वडील मनोहर सुरळकर यांना मिळाली. मुलाच्या खुनाचा राग त्यांच्या डोक्यात कायम असल्याने त्याचा बदला घेण्यासाठीच मुलाची हत्या करणाऱ्या दोघांना संपविण्याचा त्यांनी कट रचला होता. त्यानुसार वडील मनोहर सुरळकर आणि साथीदार सुरेश रवी इंधाटे हे कुणालाही संशय येऊ नये, म्हणून दोघे चक्क बुरखा घालून मुस्लिम महिलांच्या पेहरावात न्यायालय परिसरात मंदिराजवळ बसले होते.