ठाणे :लोहमार्ग कल्याण गुन्हे पथकाने दिलेल्या माहितीनुसार अहमदाबाद-कोल्हापूर एक्सप्रेसने ३० जानेवारी रोजी अहमदाबादहून निघालेल्या एका महिला प्रवाशाचे दागिने असलेली पिशवी सुरत ते भिवंडी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान चोरीला गेली होती. विशेष म्हणजे अहमदाबाद येथून प्रवासाला सुरुवात केल्यानंतर दरम्यानच्या काळात महिला प्रवासी झोपी गेल्याने या संधीचा फायदा घेत चोरटा सुभानने पाळत ठेऊन त्या महिला प्रवाशाच्या उशीखाली ठेवलेली दागिन्याची पिशवी ३० जानेवारी रोजी मध्यरात्री दोन ते चार वाजताच्या सुमारास लंपास केली होती. रेल्वे प्रवासात पहाटे जाग आल्यावर या महिलेला आपली दागिने असलेली पिशवी गहाळ झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर या महिलेने डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
या पोलीस पथकाने बजावली कामगिरी: या तक्रारीच्या अनुषंगाने मध्य परिमंडळाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, हवालदार राजेंद्र दिवटे, जनार्दन पुळेकर, रणजित रासकर, रविंद्र दरेकर, स्मिता वसावे, वैभव जाधव, महेंद्र कार्डिले, रविंद्र ठाकूर, अजित माने, अजीम इनामदार, सोनाली पाटील, स्नेहल गडगे, अक्षय चव्हाण, सुनील मागाडे, गोरख सुरवसे यांच्या पथकाने तपास सुरू केला. या पोलीस पथकाने या रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असताना रेल्वे गुन्हे पथकाला वसई रोड स्थानकाबाहेर भिंतीवरून उडी मारून त्या महिलेची पिशवी घेऊन एक इसम बाहेर पडत असल्याचे दिसले.