ठाणे - सायकल देण्याच्या बहाण्याने 12 वर्षीय अल्पवयीन मुलाला बोलावून 23 वर्षीय विकृत तरुणाने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजणक घटना घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विकृताला बेड्या ठोकल्या असून रवी असे विकृत आरोपीचे नाव आहे.
अंबरनाथ पश्चिम परिसरातील आरोपी रवी हा फिरस्ता राहतो. त्याने याच परिसरात राहणाऱ्या ओळखीच्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलाला सायकल देण्याच्या बहाण्याने दोन दिवसांपूर्वी बोलावून त्याच्यावर निर्जनस्थळी बळजबरीने अनैसर्गिकरित्या अत्याचार केला. या घृणास्पद घटनेमुळे घाबरलेल्या पीडित मुलाने घडलेल्या घटनेबाबत आपल्या घरी सांगितले नव्हते. त्यामुळे दोन चार दिवसांनंतर आरोपीने पीडित मुलाला बोलावून पुन्हा त्याच्यावर अत्याचार केला. यावेळी मात्र पीडित मुलाने आपल्या घरच्यांना घडलेल्या घटनेबाबत सांगितले.