ठाणे - एका २६ वर्षीय नराधमाने शेजारी राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रतिकार करताच आरोपीने पीडितेवर धारदार चाकूने वार केले आहेत. ही घटना बदलापूर पश्चिम परिसरातील रमेश वाडी येथील एका इमारतीमध्ये घडली आहे. दिनेश गोल्हे (वय २६), असे आरोपीचे नाव आहे.
एकाच इमारतीमध्ये राहत असल्याने ओळख निर्माण करून आरोपी नेहमी पीडितेच्या घरी जात असे. पीडित महिलेने त्याला घरी येण्यास मनाई केली असताना, आज(13 डिसेंबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास दिनेश हा पीडित महिलेच्या घरी गेला. यावेळी महिलेने त्याला जाण्यास सांगितले. राग अनावर होऊन त्याने पीडित महिलेचे तोंड दाबून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने विरोध केला असता दिनेशने त्याच्याजवळील चाकूने महिलेच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. तो वार महिलेने हाताने अडवला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी महिलेच्या घरी धाव घेतली. त्यानंतर दिनेशने घटनास्थळावरून पळ काढला.