ठाणे - आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळून आल्याने रिझर्व्ह बॅँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह सहकारी बॅंकेवर (पीएमसी बँक) सहा महिन्यांसाठीस निर्बंध लादले आहेत. आरबीआयने पीएमसी बँकेवर “प्रॉम्प्ट करेक्टीव्ह ऍक्शन” घेतली असून यापुढे बँकेला कर्ज वितरण, ठेवी स्वीकारता येणार नाहीत. त्याशिवाय खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हे ही वाचा - पीएमसी बँकेवर 'आरबीआय'कडून निर्बंध, मुंबईत बँक शाखेबाहेर लोकांची गर्दी
या निर्णयामुळे ठाण्यात पीएमसी बँकेच्या शाखेबाहेर खातेदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.
पीएमसी बँकेच्या ठाण्यात वागळे इस्टेट, किसननगर, कळवा, घोडबंदर रोड, कोलशेत रोड अशा सहा शाखा आहेत. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बॅंकेवर कलम 35 अ अंतर्गत “प्रॉम्प्ट करेक्टीव्ह ऍक्शन” घेतली आहे. 23 सप्टेंबरपासून हे निर्बंध लागू झाल्याची अधिसूचना आरबीआयने प्रसिद्ध केली आहे. ज्यामुळे बँकेच्या खातेदारांना ‘आरबीआय’च्या निर्देशानुसार बँक खात्यातून मर्यादित रक्कम काढता येते. अनियमितता दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून पुढील सहा महिन्यात त्यात यश येईल असे बँकेच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे.