ठाणे - नाशिक-मुंबई महामार्गावरून अवैधरित्या गोमांस घेऊन जाणाऱ्या चारचाकी मोटारीचा अपघात झाल्याची घटना कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाशिक-मुंबई वाहिनीवर घडली. या अपघातात मोटार चालक इम्रान शेख व हमीद शेख गंभीर जखमी झाले असून त्यांना खर्डी ग्रामीण रुग्णालयात प्रथोमोपचार करून शहापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ताबा सुटल्याने झाला अपघात
नाशिकहून मुंबईच्या दिशेने शनिवारी (दि. 25 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास (एमएच 14 डीए 9096) क्रमांकाच्या मोटारी मध्ये जवळपास दीड टन गोमांसाची वाहतूक केली जात होती. त्याच सुमारास कसारा गाव हद्दीत येताच भरधाव वेगाने निघालेल्या कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी जवळपास रस्ता सोडून 30 मीटर अंतरावर जाऊन नाशिक वाहिनीवर आदळली. त्यात कार पलटी होताच गाडीच्या डिकीमधून गोमांस दुभाजकावर पसरले. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इम्रान शेख याची प्रकृती चिंताजनक असून हमीद शेख याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. यातील एकजण फरार झाला असल्याचे घटनास्थळी असलेल्या स्थानिक नागरिकांनी सांगितले. यावेळी कसारा गावातील तरुण सद्दाम सारंग, नजीर शेख यांनी इतर तरुणांच्या मदतीने जखमींना खर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच कसारा प्रभारी पोलीस निरीक्षक केशवराव नाईक, उपनिरीक्षक सलमान खतीब, शहापूर महामार्ग पोलीस फौजदार गजेंद्र गुरव घटनास्थळी दाखल होऊन पंचानाम करत मोटार व गोमांस जप्त केले.
महिला डॉक्टरने दिले माणुसकीचे दर्शन