ठाणे -येथील मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आईसह दोन बालके जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात पती गंभीर जखमी झाला आहे. मृत महिला राबोडी येथील पतीच्या मामाकडे पाहुणचार करून बोरिवली (पडघा) येथे पतीसोबत दुचाकीवरून घरी परतत होती. यावेळी भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास महामार्गावरील वालशिंद गावाच्या हद्दीत घडली.
अरबीना सलीम खान (26), वसीम खान (6), रिहान खान (3) अशी मृतांची नावे आहेत. तर चालक पती सलीम खान (३४) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.
सलीम खान हा त्याच्या ठाणे येथील मामाकडे पत्नी आणि दोन मुलांना घेऊन होंडा शाईन दुचाकीवरून गेला होता. शुक्रवारी दुपारचे जेवण झाल्यावर तो कुटुंबीयांसह बोरिवली येथे घरी परतत होता. त्यावेळी भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावच्या हद्दीत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली.
हेही वाचा -मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू
या धडकेत दुचाकीवरील चौघेही रोडवर फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे अतिरक्तस्राव होऊ तिन्ही माय लेकांचा जागीच मृत्यू झाला. तर पती सलीमदेखील गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एपीआय दिपक भोई करत आहेत.