ठाणे - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबरोबरच लोकांमध्ये कोरोनाची दहशतही वाढू लागली आहे. त्यामुळेच कल्याण शहरातील गौरीपाडा गावातील ग्रामस्थांनी बाहेरील व्यक्तींना गावामध्ये प्रवेशबंदी केली आहे. गावात येणारे सर्व मार्ग या ग्रामस्थांनी बंद केले असून ३१ मार्चपर्यंत ही प्रवेशबंदी लागू केली आहे.
कोरोनामुळे कल्याणमधील गौरीपाडा गावात बाहेरील व्यक्तींना प्रवेशबंदी... हेही वाचा...लाजिरवाणं..! कोरोनाचा सामना करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर टाकला जातोय बहिष्कार
कोरोनाविरोधात एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार सर्व स्तरांवर लढताना दिसत आहे. महाराष्ट्रात तर सर्वत्र संचारबंदी लागू केली असून जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही काही अतिउत्साही नागरिक या मनाई आदेशाचे उल्लंघन करता घराबाहेर पडत आहेत. स्वतःबरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेला असणाऱ्या गौरीपाडा गावातील ग्रामस्थ मंडळानेही आपल्या गावामध्ये बाहेरील व्यक्तींमार्फत कोरोना येऊ नये, यासाठी खबरदारी घेतली असल्याचे निलेश म्हात्रे यांनी सांगितले.
दरम्यान, गावात येणारे तिन्ही बाजूकडील (तलावाच्या दिशेने, पाईपलाईनच्या दिशेने आणि योगीधामच्या दिशेने) रस्ते बंद करण्यात आले आहेत. याठिकाणी रस्त्यांवर बॅरिकेट्स, लोखंडी पाईप, झाडांचे मोठाले बुंधे (खोडाचा भाग) टाकून हे रस्ते बंद करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थ निलेश म्हात्रे यांनी दिली. त्यामुळे बाहेरील फेरीवाले आणि पाहुणे किंवा इतर लोकांना या गावामध्ये ३१ मार्चपर्यंत प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगण्यात आले.