ठाणे- भिवंडी शहरातील ५१ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईतील नायर रुग्णालयातून थेट भिवंडीपर्यंत प्रवास करून स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या बाहेर वावरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे रुग्णालयालगत भिवंडी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना हा रुग्ण दिसल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांनीच ही गंभीर बाब डॉक्टरांच्या निर्दशनास आणून दिली. यानंतर त्या रुग्णाला भिवंडीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती (कोव्हिड-19) रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात त्या रुग्णाविरोधात तक्रार देऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु हा पॉझिटिव्ह रुग्ण नायर रुग्णालयात दाखल असताना बाहेर आलाच कसा? त्याला भिवंडीपर्यंत कोणी आणून सोडले, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, या प्रकारानंतर रुग्णालयालगत भिवंडी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत राहणाऱ्या सुमारे दोनशे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या रुग्णाचा इतिहास पाहता हा भिवंडीत राहणारा असून २२ एप्रिलच्या पहाटे या ५१ वर्षीय किडनी विकाराने त्रस्त रुग्णाचा खासगी लॅबच्या अहवालानुसार कोरोना पॉझिटिव्ह आढळून येताच भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकाने स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती (कोव्हिडं 19) या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र या रुग्णास डायलेसिस आवश्यक असल्याने २२ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता भिवंडीतून त्याला मुंबईच्या नायर रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले होते. त्यावेळी रुग्णाची भाचीसुद्धा त्यासोबत नायर रुग्णालयात गेली. यामुळे तिला क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले आहे. त्यानंतर २३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास हा रुग्ण भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय व नजीकच्या कर्मचारी वसाहत परिसरात सुमारे पाऊण तास घुटमळताना दिसून आला. त्यावेळी महानगरपालिका कर्मचारी वसाहतीमधील काही रहिवाशांना तो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याबद्दल खात्री पटली होती. त्यांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली असता त्याची इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात रवानगी केली.