ठाणे -दिवाळी ऑफरच्या नावाने आदिवासी कुटुंबीयांना मंजूर झालेल्या शौचालय निधीचा ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व प्रशासनकडून अपहार झाल्याचा खळबळजनक प्रकार भिवंडी तालुक्यात समोर आला आहे. भिवंडी तालुक्यात लाखीवली गावातील नांदा कातकरी पाडा या वीस ते पंचवीस घरांची वस्ती असलेल्या पाड्यावरील पाच आदिवासी कुटुंबीयांची सरपंच, ग्रामसेवक यांनी संगनमताने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
भिवंडी तालुक्यात लाखीवली गावातील नांदा कातकरी पाडा येथील आदिवासी लाभार्थ्यांच्या शौचालय निधीचा अपहार.... हेही वाचा... राजस्थान : जे. के. लोन रुग्णालयात 100 बालकांचा मृत्यू , विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
देश हागणदारी मुक्त करण्यासाठी ज्या कुटुंबीयांकडे शौचालय नाही. अशाना प्रोत्साहन देण्यासाठी शासन अनुदान देऊन शौचालय उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देत आहे. भिवंडी तालुक्यातील आदिवासी उपाययोजना अंतर्गत येणारी ग्रुप ग्रामपंचायत लाखीवली असून त्यामध्ये लाखीवली, पारिवली, धामणे या तीन महसुली गावांसोबतच तब्बल १६ आदिवासी पाडे यांचा समावेश आहे.
हेही वाचा... वर्धा जिल्ह्याला गारपीट, पावसाचा तडाखा; कापूस, तूरसह संत्रा पिकांचे नुकसान
या आदिवासी कुटुंबीयांना शौचालय लाभार्थी बनवले. त्यानंतर त्यांच्या नावे प्रत्येकी बारा हजार रुपये मंजूर केले. त्यानंतर दिवाळीच्या सुमारास दिवाळी ऑफर असल्याचे सांगत त्यांना बँकेत नेवून त्यांच्या खात्यात जमा झालेल्या शौचालय अनुदानाचे पैसे काढून घेतले. त्यापैकी अवघे दोन हजार रुपये त्यांना देऊन दहा हजार रुपये हे परस्पर ग्रामपंचायत सरपंच विनोद केशव भगली, ग्रामसेवक बी. बी. जाधव, कर्मचारी अतिश पाटील यांनी स्वतः कडे ठेवून पन्नास हजार रुपयांचा अपहार केला असल्याचा आरोप उपसरपंच संतोष गुळवी यांनी केला आहे.
हेही वाचा... 'स्वातंत्र्यलढ्यात 'या' राज्यांची भूमिका महत्त्वाची, चित्ररथाला परवानगी नाकारल्याने जनतेचा अपमान'
या पाड्यावरील दिलीप नवसू वाघे, सुनील रामश्या पवार ,संजू गौऱ्या वड, भीमा गणपत वाघे, भगवान सुकऱ्या वड यांना शौचालय निधी दिल्याचे भासवून फसवण्यात आल्याचे प्रकार समोर आाल आहे. उपसरपंच संतोष गुळवी यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी पाड्यावर जाऊन संबंधित कुटुंबीयांकडे शौचालय बांधणी संदर्भात चौकशी केली. त्यावेळी ही बाब उघड झाली आहे. या संदर्भात संबंधित शौचालय लाभार्थींनी भिवंडी पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी सत्य प्रतिज्ञा पत्राद्वारे आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली. या बाबत न्याय न मिळाल्यास पंचायत समिती कार्यालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा... 'देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनीच माझे तिकीट कापले'
विशेष म्हणजे या गावातील असंख्य पाड्यांवरील नागरिक नागरी सुविधांपासून वंचित आहेत. घरकुल योजनेमध्ये मंजूर ४५ हजार रुपयांपैकी तब्बल दहा हजार रुपये ग्रामपंचायत कर्मचारी अतिष पाटील यांनी परस्पर आपल्या बँकेतून काढून घेतले. तर अनुसया लहांगे व संजना मुकणे या दोन घरकुल लाभार्थींनी त्यांच्या जवळील बँक पासबुक संबंधित कर्मचाऱ्याकडे दिल्याने त्यांची मंजूर घरकुले रद्द करण्यात आली. रामू मुकणे या लाभार्थ्यांचे घर अर्धवट बांधलेल्या अवस्थेत सोडून द्यायला भाग पाडले, असल्याचा आरोप येथील पीडित आदिवासी कुटुंबीयांनी केला आहे.