मुंबई - एक शून्य दुसऱ्या शून्याकडे गेला तरी ते शून्यच होईल, असा टोला शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीसह मनसेला लगावला. कल्याण ग्रामीण आणि ठाणे शहरमध्ये राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घेत मनसेला छुपा पाठिंबा दिला आहे. यावरुन शेलार यांनी राष्ट्रवादीसह मनसेला लक्ष्य केले. ते ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना 1 लाख 67 हजार शेततळी आणि विहिरी दिल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्या काळातील आकडेवारी सांगावी असे थेट आवाहनही त्यांनी यावेळी दिले.
मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातही सरकारने खूप कामे केली आहेत. या ठिकाणी अनेक प्रकल्प आणि बेघरांना घरे दिली आहेत. गतिमान वाहतुकीसाठी या सरकारने काम केले आहे. समृद्धी महामार्गाचेही काम चालू आहे. मेट्रो प्रकल्प देखील आपण वेगात आणला. रोजगाराकडे या सरकारने लक्ष दिले आहे.