ठाणे - शिवसेना सोडून गेलेल्यांच्या रक्तात शिवसेना नव्हतीच, गेलेले ते गद्दारच आहेत. बंड करण्यासाठी हिंम्मत लागते. शिवसेनेविरुद्ध बंड केले असते, तर गुवाहाटी, सुरतला पळून गेले नसते, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांवर माजी मंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी केली आहे. शिवसंवाद दौऱ्यानिमित्याने भिवंडीतील शिवसैनिकांच्या आदित्य ठाकरेंनी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा शिवसेना सोडून गेलेल्या लोकप्रतिनिधींना गद्दार म्हणून संबोधित केले ( Aaditya Thackeray Criticized Shinde Group Rebel Mlas ) आहे.
'त्यावेळी खाऊन त्यांना अपचन झाले' -आदित्य ठाकरे म्हणाले की, तुमची आजच्या दौऱ्यात उपस्थिती हे शिवसेनेवरचे प्रेम असल्याचे दर्शवित आहे. आतापर्यंत घडलेल्या घटना दुःखदायक असून, काहींनी धोका दिला, तर काहींनी गद्दारी केली. ज्यांना परिवारासारखे समजले त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. गेले अडीच वर्ष महाविकास आघाडीत होते. मात्र, त्यावेळी खाऊन त्यांना अपचन झाले, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे नाव न घेता, आदित्य ठाकरे यांनी केली आहे. पण, आम्ही महाविकास आघाडी सोबत असताना विकासाची कामे केली. राजकारण कमी केलं, ८० टक्के समाजकरण २० टक्के राजकारण केले.
'जिथे रहाल तिथे आनंद राहा' - जिथे रहाल तिथे आनंद राहा. आमदारकीचा राजीनामा द्या, पुन्हा निवडणूक लढवा, नंतर कळेल. सध्या अतिवृष्टीमुळे राज्यात सर्वांना त्रास होऊन लाखो नागरिक बेघर झाले आहे. मात्र, सध्याचे २ जणांच सरकार हे नागरिकांना मदत करू न शकल्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे हे सरकार कोसळणार आहे, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.