ठाणे - कल्याण पश्चिम भागात असलेल्या आधारवाडी कारागृहातील अनेक बंदीवान कैद्यांकडे जेल बॅरेकमध्ये मोबाईल आढळून आले होते. याप्रकरणी कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले. आता या मोबाईल प्रकरणाचा पोलीस तपास संपल्यानंतर आधारवाडी कारागृहाचे अधीक्षक अंकुश सदाफुले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारागृहातील कैद्यांकडे मोबाईल सापडल्यानंतरही सदाफुले यांनी ठोस कारवाई केली नसल्याने त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.
तुरुंगात होतात अनेक गैरप्रकार - कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कधी कैद्यांच्या दोन गटात हाणामारी तर कधी कारगृहातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. शिवाय २०२१ साली तर दोन कैदी कारागृहाची भिंती केबल वायरलच्या साहाय्याने ओलांडून पळून गेले होते. मात्र त्यांना काही दिवसांनी पकडून पुन्हा कारागृहात टाकले होते. त्यातच कैद्यांकडे मोबाईल सापडण्याचे प्रकार नेहमी घडत असल्याचे दिसून येत होते. त्यामध्ये काही कैदी हे आपल्या नातेवाईकांना मित्र आणि इतर कामाकरता लपूनछपून मोबाईलचा वापर कारागृहातून करत आहेत, असे आ़ढलले. विशेष म्हणजे कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात आधारवाडी कारागृहात मोबाईल आणि अन्य वस्तू सापडल्यावर अनेक गुन्हे स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. मात्र या गुन्ह्यांच्या तपासाचे पुढे काय झाले हे जेल प्रशासनाकडून सांगितले जात नव्हेत.