ठाणे - शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील एका आदिवासी पठ्ठ्याने माळरानात क्रिकेटचे धडे गिरवत त्याने किक्रेटच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यापर्यंतची मजल गाठली आहे. या पठ्ठ्याची निवड थेट थायलंड क्रिकेट प्रीमियम लिग स्पर्धेत निवड झाली आहे. वैभव विजय हिलम (वय 20 वर्षे), असे या पठ्ठ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे वैभव हा जागतिक किक्रेटपटू विराट कोहलीचा चाहता असल्याचे त्याने सांगितले.
मैदानात दुहेरी शतक ठोकले अन नशीब फळफळले
शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वाफे गावात वैभवचे कुटूंब राहते. त्याचे वडील भातसा धरण पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहेत. वैभवला लहानपणापासूनच किक्रेटची आवड असल्याने शाळा सुटताच तो माळरानातील मैदानात मित्रांसोबत तहानभूख हरवून किक्रेट खेळत होता. कधी-कधी तर त्याची आई त्याला शोधण्यासाठी माळरानातील मैदानात जाऊन एवढे किक्रेटचे वेड बरे नव्हे असे बोलून त्याला घरी घेऊन येत होती. त्यांनतर महाविद्यालयीन जीवनात वडिलांनी त्याच्या किक्रेटची आवड पाहून त्याला शहापूर शहरातील एका किक्रेट क्लबमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्यानेही जिद्द आणि मेहनतीच्या बळावर एका सामन्यात 275 धावांची खेळी केल्याने त्याचे ठाणे जिल्हा पातळीवर नाव होऊन त्याची ठाणे किक्रेट क्लब संघात निवड झाली. त्यांनतर सतत फलंदाजी व गोललंदाजी आणि क्षेत्ररक्षण यामध्ये अपेक्षित कामगीरी करीत ऑलराऊंटर म्हणून मुंबईच्या एका किक्रेट क्लबमधून तो खेळायला लागला.
मुंबईच्या मैदानातील शतकी खेळीने त्याला पोहचवले सातसमुद्रापार