ठाणे : मालेगाववरून टेम्पोतून ठाणे जिल्ह्यातील इतर शहरात विक्रीसाठी आणलेले दीड लाख रुपयांचे गोमांस कोनगाव पोलिसांच्या सर्तकतेमुळे टेम्पोसह पोलसांनी जप्त करून चालकास अटक केली आहे. नसीर अहमद अन्वर अन्सारी (४४ रा. मालेगाव, जिल्हा नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे (मार्च २०१५)पासून गोमांस विक्रीसाठी बंदी असूनही आजही भिवंडी, कल्याण, मुंब्रा, ठाणे व मुंबई या भागात हे गोमांस विक्रीसाठी ट्रक, टेम्पोमधून इतर जिल्ह्यासह परराज्यातून विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.
भिवंडी तालुक्यातील मुबंई : नाशिक महामार्गावरील रांजणोली बायपास नाका येथील टाटा आमंत्रा सोसायटीच्या गेटजवळ कोनगाव पोलिसांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास नाकाबंदी केली होती. यावेळी पोलिसांना टेंपो क्रंमाक, एम. एच १२-एल. टी. ४४५२)यामध्ये गोमांस वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार नाकाबंदीमध्ये प्रत्येक वाहन तपासणी करीत असताना अशोक लेलँड टेम्पोच्या आतमध्ये पोलिसांनी पहाणी केली असता, जनावराचे मांस असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी पशु वैद्यकीय अधिकारी यांना घटनस्थळी बोलावून मांसाच्या तुकड्याची तपासणी केली असता गोवंश जनावराची कत्तल केलेले मांस असल्याचे निष्पन्न झाले.