ठाणे : मुंबई-नाशिक द्रुतगती महामार्गावरून दोघे मित्र दुचाकीवरून भिवंडीहून मुंबईच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली असता, झालेल्या अपघातात दोघांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना महामार्गावरील खारेगाव ब्रिजलगतच्या बॉम्बे ढाब्यासमोर घडली आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात भीषण अपघाताच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सूरज सुनिल कुंचिकोरवे (२६), मुत्तू लक्ष्मण मुरघन तेवर (२६ दोघे रा.धारावी, मुंबई) अशी अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या मित्रांची नावे आहेत.
ट्रक चालक ट्रकसह घटनस्थळावरून फरार : मृतक सूरज, मुत्तू दोघेही जिवलग मित्र असून मुंबईतील धरावी भागात रहात होते. त्यातच २८ फेब्रुवारी रोजी (मंगळवारी) रात्रीच्या सुमारास मृतक सूरज हा त्याची (बुलेट) रॉयल इंटफिल्ड दुचाकी घेऊन त्याचा मित्र मुत्तू याच्यासोबत मुंबईहून फिरण्यासाठी भिवंडी परिसरात कामा निमित्ताने आले होते. ते दोघे मुंबईतील धारावी येथील घरी परत जाण्यासाठी रात्रीच्या सुमारास निघाले होते. दरम्यान भिवंडीहुन मुंबईच्या दिशेने बुलेट वरून जात असतानाच, त्यांची बुलेट खारेगाव ब्रिजलगतच्या बॉम्बे ढाब्यासमोर येताच भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने बुलेटला जोरदार धडक दिली. त्यांच्या डोक्यावरून चाके गेल्याने दोघांच्याही डोक्याचा चुराडा झाला. ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून फरार झाला आहे.